Kerala: वायनाडमध्ये भूस्खलन, शेकडो लोक अडकल्याची भीती

केरळच्या वायनाड जिल्ह्यात डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता या भागात भूस्खलन झाले. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास या जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झाल्याचं वृत्त आहे.

मदत कार्यासाठी म्हणून अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अतिरिक्त NDRF टीम वायनाडला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.

किमान 16 लोक मेपाडी येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.

X वर वेस्ट कोस्ट वेदरमनने यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) च्या फेसबुक पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

एका निवेदनात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, ‘वायनाडमधील भूस्खलनावर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल.’

‘आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री वायनाडला भेट देतील आणि मदत कार्यावर देखरेख ठेवतील’, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.