Kerala: वायनाडमध्ये पावसाचा कहर, तीन ठिकाणी भूस्खलन; 63 जणांचा मृत्यू

kerala-waynad

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली आहे. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 116 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटे 2 वाजता या भागात पहिलं भूस्खलन झालं. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलन झालं.

अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अतिरिक्त NDRF टीम वायनाडला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.

वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूर येथून रवाना झाल्या आहेत.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) च्या फेसबुक पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलं असून आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 9656938689 आणि 8086010833 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.