केरळकडून मुंबईला धक्का

रोहन कन्नुमल (87) आणि सलमान निजार (नाबाद 99) यांच्या फटकेबाजीमुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळने उभारलेल्या 5 बाद 234 धावांचा पाठलाग करण्यात मुंबईला 43 धावांनी अपयश आले. कर्णधार श्रेयस अय्यर (32) आणि अजिंक्य रहाणेला (68) केरळच्या आव्हानाला नीटमध्ये नियंत्रणात ठेवता आले नाही. आघाडीच्या मुंबईच्या चारही फलंदाजांना छोटय़ा का होईना धावा केल्या. पण त्यानंतर एकही फलंदाज टिकू न शकल्यामुळे मुंबईने आधीच सामना गमावला होता. तरीही अजिंक्य रहाणेच्या फटकेबाजीमुळे मुंबईने दोनशेसमीप पोहोचण्याची किमया साधली. आजचा पराभव हा मुंबईचा पहिलाच पराभव असून मुंबईला अजून तीन सामने खेळावयाचे आहेत. एकूण पाच गट असलेल्या या स्पर्धेत दहा संघ बाद फेरीत पोहोचतील. आतापर्यंत राजस्थान, बडोदा आणि दिल्ली या संघांनी विजयाचे चौकार ठोकले आहेत. मुंबईला तीन सामन्यांत दोन विजय मिळवता आले आहेत.

सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय

मोहित जांगडाच्या 34 चेंडूंतील नाबाद 67 धावांमुळे मिझोरमने 5 बाद 176 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. 177 धावांचा पाठलाग करताना पंजाबवर पराभवाचे संकट होते. 4 चेंडूंत 24 धावांची गरज असताना हरप्रीत ब्रारने 4, 6,6,6 अशी फटकेबाजी करत पंजाबला आश्चर्यकारकरीत्या बरोबरी साधून दिली. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने 1 बाद 15 धावा केल्या होत्या, तर मिझोरमला केवळ सातच धावा करता आल्या आणि पंजाबने 8 धावांनी सामना जिंकला.