येमेनच्या तुरुंगात असलेल्या केरळची नर्स निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला येमेनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अल-अलिमी यांनी मंजुरी दिली आहे. येमेन न्यायालयाने निमिषा हिला हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती, ज्याला आता तेथील राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यातच निमिष हिला कायदेशीर मदत पोहोचवण्यात हिंदुस्थानच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं दिसत आहे.
निमिषा प्रियाच्या प्रकरणी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, सरकार निमिषा प्रियाच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांनी मागितलेल्या सर्व कायदेशी बाबींसाठी सहकार्य करेल. सरकार तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया हिला 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहदीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निमिषा 2012 मध्ये नर्स म्हणून नोकरीसाठी येमेनला गेली होती. 2015 मध्ये निमिषा आणि तलाल यांनी मिळून तिथे क्लिनिक सुरू केले. तलालने क्लिनिकमध्ये शेअरहोल्डर म्हणून आपले नाव समाविष्ट करून फसवणूक करून अर्ध्या उत्पन्नाचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तो निमिषाचा नवरा असल्याचं कागदोपत्री दाखवून तिची फसवणूक केली. निमिषाने याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. तलालने तिला मारहाण आणि लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
या छळाला कंटाळून निमिषाने जुलै 2017 मध्ये तलालला नशेचे इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निमिषाचे म्हणणे आहे की, तलालला मारण्याचा तिचा हेतू नव्हता आणि तिला फक्त तलालकडे असलेला तिचा पासपोर्ट परत मिळवायचा होता. आता याच प्रकरणी तिला फाशीची शिक्षा झाली आहे.