केरळमधील निमिषा प्रिया या नर्सने पतीची हत्या केल्यामुळे तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येमेनचे अध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी यांनी या शिक्षेला मंजुरी दिली. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निमिषाला शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले आहे.
2017 मध्ये तलाल अब्दो महदी याची हत्या केल्याप्रकरणी प्रियाला ही शिक्षा सुनावण्यात आली. छळाला कंटाळलेल्या प्रियाने तिच्या पतीच्या ताब्यातील आपला पासपोर्ट घेण्यासाठी त्याला गुंगीचे औषध दिले होते. फिर्यादीने या प्रकरणात निमिषानेच हत्या केल्याचे सिद्ध केले. महदी आणि निमिषा यांनी दोघांनी मिळून एक इस्पितळ सुरू केले होते, मात्र नंतर वादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. निमिषाने पतीला संपवून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. महदीने केलेल्या छळाचा बदला घेण्यासाठी निमिषाने ही हत्या केल्याचे सांगितले जाते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी याप्रकरणी आम्ही प्रियाच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे स्पष्ट केले.
वाटाघाटीसाठी आई परदेशात
येमेनच्या अध्यक्षांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला मंजुरी दिल्यानंतर एक महिन्याच्या आत शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. दरम्यान, पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना किती रक्कम द्यायला हवी यासंबंधी वाटाघाटी करण्यासाठी निमिषाची आई येमेनची राजधानी सना येथे गेली आहे. हिंदुस्थानच्या दूतावासाने नेमलेल्या वकिलाने या प्रकरणातील पुढील चर्चेसाठी 20 हजार डॉलर प्री-निगोशियशन फी मागितल्यानंतर सप्टेंबर महिन्यात वाटाघाटी रखडल्या होत्या.