जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची अफवा, तपासणी सुरू असताना मशमाशांचा हल्ला, 70 जण जखमी

जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर बॉम्बशोधक पथक तात्काळ दाखल झाले आणि तपास सुरू केला. कार्यालयाच्या परिसरात बॉम्बचा शोध घेत असतानाच अचानक मधमाशांच्या झुंडीने हल्ला केला. या हल्ल्यात 70 जण जखमी झाले आहेत. केरळमधील तिरुवनंतपुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही घटना घडली.

जखमींमध्ये सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार आणि अभ्यागतांचा समावेश आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुवअनंतपुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एक मेल आला. या मेलमध्ये कार्यालयातील पाईपमध्ये आरडीएक्ससारखे स्फोटक असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली.

पोलीस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने तात्काळ कार्यालय खाली करून सर्वत्र शोध सुरू केला. परिसरात तपासणी करताना कार्यालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून माशा बाहेर आल्या. या माशांनी तपासणी करत असलेल्या पोलीस अधिकारी, बॉम्बशोधक पथक, सरकारी अधिकारी यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या पत्रकार आणि अभ्यांगतांवर हल्ला केला.

दरम्यान, संपूर्ण तपासणीनंतर बॉम्बची धमकी खोटी असल्याची पुष्टी केली. पोलीस ईमेल पाठवणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत.