पक्षांतर करायचेय तर आधी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा; केरळ हायकोर्टाचा दलबदलू लोकप्रतिनिधींना सज्जड दम

neta-leader

पक्षांतर करायचे असल्यास सरळ राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. लोकशाही मार्गाने मतदारांमुळे तुम्ही निवडून आलात. मतदारांची राजकीय पक्षाशी नाळ जोडलेली असते. त्यामुळेच तुम्हाला मतदान होते हे लोकप्रतिनिधींनी विसरू नये. पक्षांतर करून मतदारांचा अपमान करू नका, असा सज्जड दमच केरळ उच्च न्यायालयाने दलबदलू लोकप्रतिनिधींना दिला आहे.

के. आर. जयकुमार व अन्य पाच जणांनी केलेल्या जामीन अर्जावर निर्णय देताना न्या. पी. व्ही. कुन्हीकृष्णन् यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींची चांगलीच कानउघाडणी केली. मतदारांच्या इच्छेनुसार लोकप्रतिनिधी निवडून येतात. मतदार व लोकप्रतिनिधींमध्ये वेगळेच नाते असते. याद्वारेच सुंदर लोकशाही टिकते. मतदारांचा आदर करा. अन्यथा जनता पुढच्या निवडणुकीत तुम्हाला वठणीवर आणेल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

जनता मतपेटीतून जागा दाखवते

लोकांनी, लोकांसाठी व लोकांद्वारे स्थापन झालेले सरकार म्हणजे लोकशाही, अशी सुंदर व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केली आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. भारतीयांची प्रत्येक कृती लोकशाहीच्या मूल्यांना प्रोत्साहन देणारीच असायला हवी. याविरोधात कोणी गेले तर जनता त्याला मतपेटीतून जागा दाखवते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण…

के. जयकुमार व अन्य आरोपींवर कोथातुकुलाम नगर सभेतील लेफ्ट डेमोव्रेटिक फ्रंटच्या नगरसेविकेवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यात जामीन मिळावा यासाठी त्यांनी याचिका केली होती. न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींनी तपासात सहकार्य करावे. आरोपींना अटक करण्याची वेळ आल्यास तपास अधिकाऱयाने त्यांना 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर करावा. आरोपींनी पुराव्यांशी छेडछाड करू नये. पुन्हा कोणत्याही लोकप्रतिनिधीवर हल्ला करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.