टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून गळ्यात पट्टा घालून फिरवलं; कुत्र्यासारखं पाणी पिण्यास भाग पाडलं, मालकाच्या क्रूरपणाचा व्हिडीओ व्हायरल

टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून कंपनी मालकाने कर्मचाऱ्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवले. एवढेच नाही तर कुत्र्यासारखे वाडग्यामध्ये पाणीही प्यायला लावले. हा संतापजनक प्रकार केरळच्या कोची शहरामध्ये घडला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मालकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

एका खासगी कंपनीचा मालक हुबैल याने सेल्सचे टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून कंपनीतील पुरुष कर्मचाऱ्यांना क्रूर वागणूक दिली. मूळचा वायनाड येथील रहिवासी असलेल्या हुबैलने कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये पट्टा बांधला, त्यांना कुत्र्यासारखे फिरवले, कुत्र्यासारखे वाडग्यामध्ये पाणी पिण्यासही भाग पाडले. एवढेच नाही तर खोलीत कोपऱ्यामध्ये कुत्र्यासारखे पाय वर करून लघवी करण्यास, कपडे काढून अश्लील हावभाव करण्यास, तसेच चावून फेकून दिलेले फळं आणि फरशीवर पडलेली नाणीही चाटण्यास भाग पाडले.

मातूभूमीने दिलेल्या वृत्तानुसार, घरोघर जाऊन कंपनीची उत्पादनं विकणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुबैलने टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून शिक्षा दिली आहे.  विशेष म्हणजे हुबैलला याआधीही अशाच गैरकृत्यांप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या होत्या. त्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, मालकाच्या भीतीने कर्मचारी सर्वकाही निमूटपणे सहन करतात. मालक कर्मचाऱ्यांना 6000 ते 8000 वेतन देतो. अधिक पगाराचे अमिष दाखवून कमी पगारात काम करून घेतले जाते. एवढेच नाही तर त्याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचाही छळ केल्याचा दावा करण्यात आला आहे.

महिला कर्मचाऱ्यांचा छळ

हुबैलच्या कंपनीचे उत्पादन घरोघर जाऊ विकणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत तो गैरवर्तन करायचा. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी त्याची पोलिसात तक्रारही केली होती. हुबैल घरी येऊन आमच्याशी गैरवर्तन करायचा, एवढेच नाही तर बाहेर जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मोबाईल फोनही जप्त करायचा, असा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला होता. पोलीस तपासावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण झाल्याचाही आरोप केला. याप्रकरणी पेरुंबवूर पोलिसांनी त्याला अटकही केली होती.