उत्सवादरम्यान अचानक हत्ती बिथरला, माहुताला चिरडून मारलं; दुकानं आणि वाहनांचीही तोडफोड

केरळच्या पालक्काड मध्ये कुट्टनाड परिसरात एका हत्तीने अचानक लोकांवर हल्ला केला. यामध्ये माहूताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पलक्कडमधील कुट्टनाड येथील एका मंदिरात घडली. येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास, हत्ती अचानक बिथरला. त्याने आधी माहूतला चिरडले आणि नंतर मंदिराच्या आजूबाजूच्या दुकानांचे आणि तिथे उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.मात्र, हत्ती इतका का बिथरला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या हत्तीने आपल्या माहुताला चिरडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हत्तीवर माहुतासह चार लोकं बसली होती. दरम्यान अचानक हत्ती बिथरला आणि त्याने झटकन माहुताला जमिनीवर टाकले. त्यानंतर हत्तीने माहुताला पायाखाली चिरडले. दरम्यान त्यावेळी आजुबाजुला अनेक लोकं होती. त्यांनी हत्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बिथरलेलाच होता. त्यानंतर हत्तीने अनेक दुकाने, रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे प्रचंड नुकसान केले.

व्हिडीओत हत्तीने माहूताला त्याच्या पायांनी चिरडले, त्यानंतर तो बेशुद्ध झालेला दिसत आहे. यानंतरही हत्तीने सोंडेने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हत्तीवर तीन लोक बसले होते. हत्तीच्या मागून काही लोक त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत, जेव्हा हत्ती मागे वळला तेव्हा हत्तीवर बसलेले सर्व लोक जमिनीवर पडले. त्यापैकी एक उंचावरून पडल्यानंतर बेशुद्ध पडला. दुसरा जमिनीवर पडल्यानंतर लगेच उठला आणि तिथून पळून गेला. हत्तीच्या हल्ल्यात माहूतचा मृत्यू झाला. काहींनी त्यांच्या मोबाईलमध्ये संपूर्ण घटनेचे व्हिडिओही काढले, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.