महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेले केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान हे विधान प्रक्षोभक, द्वेष पसरवणारे आणि निषेधार्ह आहे, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी शपथभंग करणारे विधान केले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे हे संघ परिवारांच्या विचारांचा प्रसार करत आहेत. अशा वक्तव्याचा उद्देश केरळला वेगळे करणे आहे. त्यामुळे अशा द्वेषपूर्ण मोहिमांविरोधात धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शक्तींनी एकजूट व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.