![raging](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/03/raging-696x447.jpg)
देशभरात रॅगिंगवर बंदी असताना आजही रॅगिंगच्या बातम्या समोर येत असतात. केरळमधील कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये ज्युनियर नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर रॅगिंग केल्याचे प्रकरण ताजे असताना केरळमधून आणखी एक रॅगिंगची घटना समोर आली आहे. करियवट्टोम येथील एका सरकारी महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने त्याच्या सिनीअर्सवर मारहाण केल्याचा आणि खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी घडली असून सात विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा आरोप आहे.
विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो मित्रासोबत कॅम्पसमधून जात असताना काही सिनीअर्सनी त्यांना रोखले. त्यांनी मारहाण केली. या दरम्यान त्याचा मित्र तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला. त्याने तातडीने मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. मात्र सिनीअर्सनी त्याला बांबूने आणि बेल्टने मारहाण केल्याचा विद्यार्थ्याने आरोप केला आहे. एवढेच नाही तर धक्कादायक म्हणजे सिनीअर्सनी त्यांना मारहाणीनंतर मला युनिट रूममध्ये नेले. तिथे त्याला कोंडून ठेवले. त्याचा शर्ट काढून गुडघ्यावर बसवले. त्यानंतर पिण्याचे पाणी मागितले असता एका सिनीअरने ग्लासात थुंकून मला पाणी दिले. शिवाय रॅगिंग विषयी कुठे वाच्छता न करण्याची धमकीही दिली. घटनेच्या दिवशीच पीडित विद्यार्थ्याने याबाबतची तक्रार दाखल केली. पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, सिनीअर्सनी त्याला त्याच्या मित्राविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. मित्रानेच त्याला मारहाण केल्याचे सांगायला सांगितले.
कझाकुट्टम पोलिसांनी 11 फेब्रुवारी रोजी भारतीय दंड संहितेच्याकलमांखाली गुन्हा दाखल केला. केरळ रॅगिंग प्रतिबंधक कायदा-1998 च्या तरतुदींनुसार, आम्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संस्थेत रॅगिंग झाले आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करण्याची विनंती केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुख्याध्यापकांनी सोमवारी या संदर्भात अहवाल सादर केला. यामध्ये विद्यार्थ्याची तक्रार बरोबर असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्याने सांगितले की, अहवालाच्या आधारे रॅगिंगचे कलम जोडण्यात आले आहे. लवकरच न्यायालयात अहवाल सादर केला जाईल.