
संपूर्ण देशात विश्वासार्हता असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकारने घातला होता; पण आता सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरीतून राज्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न महायुती सरकारने सुरू केला. परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली आहे. पण आता केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
परराज्यातील लॉटरीच्या आक्रमक विक्रीमुळे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विक्रीत घट झाली आहे. पंजाब, राजस्थान, नागालँड, मिझोराम, गोवा अशा विविध राज्यांच्या लॉटरीनी महाराष्ट्रात हायपाय परसले. वित्त खात्याच्या अखत्यारीतील राज्य लॉटरी संचालनालयाच्या धोरणामुळे राज्याच्या लॉटरी विक्रीत कमालीची घट झाली.
महसुलाचे गणित
महाराष्ट्र राज्याच्या लॉटरी विक्रीतून 25 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तर इतर राज्याच्या लॉटरी विक्रीतून 150 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून मिळतो.
बंद करण्याचा घाट उधळला
मध्यंतरी तोटा झाल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकारने घातला होता; पण महाराष्ट्र राज्य लॉटरी विव्रेता सेना या संघटनेने वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लॉटरी बंद करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली.
आता महसूल वाढवण्याचे प्रयत्न
राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने आता विविध माध्यमांतून महसुलात वाढ करण्याचे प्रयत्न महायुती सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत अमित साटम, चंद्रकांत नरके, विठ्ठल लंघे, चेतन तुपे, शेखर निकम, रोहित पवार, सुनील प्रभू अमित देशमुख या आमदारांसह राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचा समावेश आहे.
सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सध्याच्या अवस्थेला राज्य सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केला आहे. मूळात महाराष्ट्र राज्य लॉटरीची वितरण व्यवस्थाच नाही. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकिटासाठी प्रत्येक विव्रेत्याला राज्य लॉटरीच्या वाशीतील ऑफीसमध्ये जावे लागते. राज्याच्या ग्रामीण भागातील विव्रेत्यांना प्रत्येक वेळेस नवी मुंबईत (वाशी) जाऊन तिकीट विकत घेणे शक्य होत नाही. इतर राज्यातील डिअर, राजश्री, गोल्डन अशा लॉटरीची वितरण व्यवस्था थेट लॉटरी विव्रेत्यांच्या स्टाँलपर्यंत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्रीच घटली आहे. राज्य लॉटरीची दररोजची विक्री वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत घसरली आहे. सणासुदीच्या बंपर लॉटरीची विक्री प्रचंड होती पण आता दिवाळी, गुढीपाडव्याची बंपर विक्रीही 70-75 टक्क्यांवर आली आह,s अशी खंत विलास सातार्डेकर यांनी व्यक्त केली.