
केईएम रुग्णालयात अनेक ठिकाणी अक्षरशः घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्याची गळती होत असून त्या ठिकाणी गुटखा आणि पानाच्या पिचकाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. प्रसूतिगृह आणि महिला शस्त्रक्रिया विभागाबाहेर हे चित्र दिसत आहे. सीव्हीटीसी इमारतीत तर वॉर्डबाहेरच रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः बिछाना टाकून ठाण मांडून बसलेले दिसतात. वॉर्डमधील शौचालयाचे कोपरेही थुंकून घाण करण्यात आले असून बेसिनही अनेकदा तुंबलेली दिसतात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनाही विविध आजारांचा संसर्ग होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.
महिला प्रसूतिगृहाबाहेर वऱहांडय़ाच्या खिडकीतून बाहेर डोकावल्यास सांडपाण्याचा पाईप फुटल्याचे दिसते. त्यातून सतत सांडपाणी वाहत असून त्याच ठिकाणी पानाच्या आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या रुग्णांचेच नातेवाईक मारताना दिसतात. त्या ठिकाणी प्रसूतिगृह असल्याने नुकत्याच जन्माला आलेल्या अर्भकांना आणि मातांनाही विविध प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका ठिकाणी अडगळीचे सामान पडलेले दिसले. तिथेच सांडपाणीही तुंबलेले दिसले. अनेक ठिकाणी चहाचे कप तसेच इतर कचरा फेकण्यात आलेला दिसला. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ
शकल्या नाहीत.एका बेडवर दोन रुग्ण
केईएममध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल होत असतात. सध्या उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे भविष्यात उष्माघाताचे रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकतात. अशा वेळी रुग्णालयात पुरेसे बेड्स उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण होते. रुग्णांची संख्या वाढल्यास एकाच बेडवर दोन रुग्णांना ठेवले जात असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. काही दिवसांपूर्वी असा प्रकार वॉर्ड क्रमांक 12 मध्ये घडला होता, असे ते म्हणाले.
जिन्यातही रुग्णांच्या नातेवाईकांचे बस्तान
सीव्हीटीसी इमारतीत जिन्यातही रुग्णांचे नातेवाईक बिछाना टाकून झोपल्याचे दिसले. त्यामुळे अनेकांना रुग्णालयात येताना आणि जाताना अडचणी येतात.
सीव्हीटीसी इमारतीत एकच लिफ्ट सुरू
सीव्हीटीसी इमारतीत दोन लिफ्ट असून त्यापैकी एकच लिफ्ट सुरू आहे. लिफ्टमधून रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर तसेच रुग्णांसाठी लागणारे साहित्य यांची ने-आण करण्यामध्ये गैरसोय होते.