
बदलत्या जीवनशैलीमुळे गर्भावस्थेतच मधुमेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. तब्बल 500 महिलांतील 40 टक्के महिलांना गरोदरपणात मधुमेहाची लागण झाल्याचे केईएमच्या सर्वेक्षणातून समोर आले. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांत प्रसूती झालेल्या महिलांना विविध तपासण्या आणि त्यानुसार विविध आजारांवर मोफत उपचार करून घेण्याची सुविधा केईएम रुग्णालयात देण्यात येणार आहे. रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही सुविधा देण्यात येणार आहे.
गर्भधारणा झाल्यानंतर बाळ सुदृढ राहावे यासाठी गर्भवतींना सकस आहार घेण्यास सांगण्यात येते, परंतु अशावेळी वजन किती वाढते याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. प्रसूतीनंतर वजन कमी होत नाही. त्यामुळे पुन्हा साखर नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे त्यांना साखरेसह विविध तपासण्या करून घेण्याची गरज असते, अशा महिलांसाठी रुग्णालयात मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केईएमच्या एण्डोक्रोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर यांनी दिली.