होरपळलेल्या पुरुष रुग्णांवरही होणार केईएममध्ये उपचार, नवीन अद्ययावत बर्न आयसीयू विभागाचे काम सुरू

केईएम रुग्णालयात आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या. परंतु आता भाजलेल्या, होरपळलेल्या पुरुष रुग्णांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवीन अद्ययावत अशा बर्न आयसीयूचे काम सुरू करण्यात आले असून चार महिन्यांत हा विभाग पूर्णपणे तयार होईल, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशा बर्न आयसीयूमध्ये एकूण 12 बेड्स असतील. त्यातील तीन बेड्स हे वेगवेगळे असतील. एका बेडवर एका रुग्णावर उपचार करण्यात येतील. ऑक्सिजन, बाथ ट्रॉली अशा विविध सुविधा या कक्षात असतील, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनीता पुरी यांनी दिली. रुग्णालयात बर्न वॉर्डमध्ये केवळ महिला आणि मुलांसाठीच स्वतंत्र शौचालये होती. मात्र आता पुरुष रुग्णांसाठीही अशी शौचालये उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, बर्न वॉर्डचे नूतनीकरण सुरू झाले असून अद्ययावत आयसीयू वॉर्ड उभारण्यासाठी शिरीष लिंबडी आणि विना लिंबडी यांनी आर्थिक मदत केली.

परिचारिकांना प्रशिक्षण

बर्न आयसीयूमध्ये रुग्णांना कशा प्रकारे हाताळावे. त्यांच्यावरील उपचार तसेच औषधे इत्यादींबद्दलचे विशेष प्रशिक्षण परिचारिकांना देण्यात येतील, एक नर्स दोन रुग्णांची काळजी घेईल, असेही डॉ. विनीता पुरी यांनी सांगितले. असे विशेष बर्न वॉर्ड मसीना आणि कस्तुरबा रुग्णालयात आहेत. आयसीयूमध्ये ऑक्सिजनसह विविध आवश्यक उपकरणेही उपलब्ध करून देण्यात येतील, असे डॉ. पुरी यांनी सांगितले.