पोलिओसारख्या आजाराला आपण सर्वांनी एकत्र येऊन हरवले तसेच आता नॉन-अल्कोहोलिक स्टिटो हेपेटायटीस आजारालाही (फॅटी लिव्हर) हटवण्यासाठी संकल्प करूया, असे आवाहन बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज केले. या मोहिमेत आपण ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून पालिकेसोबत काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमिताभ बच्चन यांनी आज पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त भेट दिली. या वेळी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आजाराबाबतच्या माहिती पुस्तिका आणि केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
पालिकेच्या परळ येथील ‘सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारपासून अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये आज बिग बींनी हजेरी लावत पालिकेच्या कामाचे कौतुक केले. एखाद्या संस्थेच्या इतिहासात 100 वर्षांचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असतो. वेगाने बदलणाऱ्या जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवा-सुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केईएम संस्थेच्या यशामध्ये आणखी 100 वर्षांची भर पडावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, शल्यचिकित्सक डॉ. जयंत बर्वे उपस्थित होते.
केईएममध्ये पहिली विशेष ओपीडी
नॉन-अल्कोहोलिक सोरायसीस या आजारामध्ये फॅटी लिव्हरमुळे रुग्णाला सोरायसीस होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणाईत वाढणाऱ्या या आजारासाठी पालिका क्षेत्रातील पहिल्या बाह्य रुग्ण विभागाची सुरुवात केईएम रुग्णालयात करण्यात आली. प्रत्येक शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही ओपीडी कार्यरत असणार आहे.
डॉक्टरांच्या विश्वासामुळे अर्धा आजार बरा होतो!
कोव्हिडच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्ण सेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुकही अमिताभ बच्चन यांनी केले. अनेकदा डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रुग्णांचा 50 टक्के आजार बरा होतो. त्यामुळे मानवतेसाठी सुरू असणारे अविरत कार्य हे समाजातील शेवटच्या घटकाचा लाभ होईल या उद्देशाने केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून अखंडितपणे व्हावे, अशी सदिच्छाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.