हिवाळा आला असून आता हवामान थंड होऊ लागताच प्रत्येकाला अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. यातच जर घरात नवजात बाळ असेल तर जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. कारण हिवाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यांच्या खाण्यापिण्याची, वस्त्राची विशेष काळजी घ्यावी लागते आणि या सर्व बाबींमध्ये थोडासाही निष्काळजीपणा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. या काळात बाळाला आंघोळ घालताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. चला तर मग आज जाणून घेऊया नवजात बालकांच्या आंघोळीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी…
पाण्याच्या तापमानावर ठेवा लक्ष
हिवाळ्यात लहान मुलांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचे तापमान खूप महत्त्वाचे असते. लहान मुलांना जास्त गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ घालू नये. त्यांना आंघोळ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. यासाठी काही वेळ हात पाण्यात बुडवून ठेवा. जर पाणी थोडेसे गरम किंवा थंड वाटत असेल तर बाळाला आंघोळ करण्यापूर्वी त्याचे तापमान अॅडजस्ट करा.
पाण्यात खोबरेल किंवा मोहरीचे तेल मिसळा
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे काही वेळा मुलांच्या अंगावर पुरळ उठतात किंवा त्वचा खूप कोरडी होते. अशातच त्वचेच्या या सर्व समस्या टाळण्यासाठी बाळाला आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात दोन-तीन थेंब खोबरेल किंवा मोहरीचे तेल टाका. यामुळे त्यांची त्वचा कोरडी होणार नाही आणि आर्द्रतेमुळे त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या उद्भवणार नाही.