उन्हाळ्यात माठ खरेदी करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

सध्याच्या घडीला बाजारामध्ये अनेक प्रकारचे माठ उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी शरीराला आतून थंडावा देते. म्हणूनच खासकरून उन्हाळ्यामध्ये मडक्याचा वापर केला जातो. मातीच्या भांड्यातून मातीच्या सुगंधासह पाणी पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. प्राचीन काळी, उन्हाळ्याच्या काळात प्रत्येक घरात आणि रस्त्याच्या कोपऱ्यात मातीची भांडी दिसत असत. आजच्या आधुनिक युगात, या मातीच्या भांड्यांची जागा रेफ्रिजरेटरने घेतली आहे. परंतु आजही अनेक घरांमध्ये लोक मातीच्या भांड्यातील पाणी पिणे पसंत करतात. मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका राहत नाही. मातीच्या भांड्यातील पाणी रेफ्रिजरेटरच्या पाण्यापेक्षा तहान अधिक चांगल्या प्रकारे भागवते. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात मटका घरी आणतात.

आजकाल साध्या मडक्यांऐवजी बाजारात वेगवेगळ्या डिझाइनची मडकी पाहायला मिळतात. नळ असलेले विविध रंगानी रंगवलेली मडकी बाजारात पाहायला मिळतात. म्हणूनच मडके खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. अनेकदा मडके घरी आल्यानंतर कळते की, त्या मडक्यात पाणीच थंड होत नाही. म्हणूनच मडके निवडण्याआधी काही गोष्टी या लक्षात ठेवायलाच हव्यात. तुम्ही उन्हाळ्यात स्वतःसाठी मडके खरेदी करणार असाल तर या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुम्हालाही मडक्यातील गारेगार पाण्याचा आस्वाद घेता येईल.

लाल रंगाचा माठ
मातीच्या भांड्यातील पाणी थंड होणे हे नेहमीच त्याच्या मातीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत तुम्ही भांडे खरेदी करता तेव्हा त्याची गुणवत्ता तपासा. थंड पाण्यासाठी लाल आणि काळ्या मातीचे मडके सर्वात उत्तम मानले जाते.

जाडी आणि वजन पहा
मडके खरेदी करताना वजनाला जड आणि जाड काठ असलेले मडके खरेदी करावे. अशा मडक्यात पाणी बराच काळ थंड राहते. तसेच मडके सहजासहजी तुटतही नाही. मडके विकत घेताना त्यावर हाताने टॅप करावे. मोठा आवाज येत असल्यास ते पोकळ मडके असते. कमी आवाजाचे मडके घ्यावे ते भरीव असते.

गळती चाचणी करा
तुम्ही मडके खरेदी करायला जाल तेव्हा दुकानातच त्यात पाणी टाकून गळतीची चाचणी करा. भांडे कुठून गळत आहे का? असे केल्याने तुम्हाला पुन्हा दुकाना जावे लागणार नाही.

रंग, आकार पाहा
रंगीबेरंगी चमकदार मडके खरेदी करणे टाळा. या मडक्यांमध्ये पाणी थंड होत नाही. म्हणूनच केवळ मातीचे मडके खरेदी करावे.