सोलापूर शहराचे ‘कचरापूर’ होण्यापासून रोखा, ‘संभाजी आरमार’चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

देशभरात सोलापूर शहर हे कामगार, गिरण्यांचे, वस्रोद्योग आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. शहर अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आणि वाहतूक समस्यांसारख्या प्रश्नांना तोंड देत आहे. आता नव्याने कचऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. हे कचऱयाचे ढिगारे पाहिले असता, सोलापूरचे ‘कचरापूर’ होते की काय, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे शहरातील कचरा तातडीने उचलून शहर स्वच्छ ठेवण्यात यावे, अशी मागणी ‘संभाजी आरमार’च्या वतीने अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरील वाहणारे पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात व व्यावसायिकांच्या दुकानात शिरून भरपूर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भर म्हणून शहरभरात जागोजागी सार्वनिक ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्याने कचऱयाचे ढीग साचले आहेत. या कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे चादरीसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूर शहर ‘कचरापूर’ होते की काय, अशी भीती नागरिकांना काटत आहे. शहरातील कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे वाढती दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढतच असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून, महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या जीविताशी धोकादायक असणारे शहरातील साचलेले कचऱयाचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य हटवून नागरिक व बालकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास ‘संभाजी आरमार’च्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आला आहे. यावेळी अनंतराव नीळ, सागर ढगे, रेवणसिद्ध कोळी, सोमनाथ मस्के, सागर दासी, अक्षय सिद्राल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.