लोअर परळमध्ये साकारले केदारनाथ मंदिर

‘लोअर परळचा महाराजा’ अशी ओळख असलेल्या लोअर परळ विभाग पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्तराखंड येथील सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिर देखावा साकारला आहे. ज्या भाविकांना प्रत्यक्षात उत्तराखंड येथे जाऊन प्रत्यक्ष केदारनाथ मंदिर पाहता येत नाही त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरणार आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

1945 साली स्थापना झालेले लोअर परळ विभाग पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गिरणगावातील एक प्रमुख गणपती मंडळ म्हणून ओळखले जाते. या वर्षी मंडळाचे 80 वे वर्ष आहे. त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते काहीतरी भव्यदिव्य करण्याचा विचार करत होते. मंडळाचे अध्यक्ष, आमदार सुनील शिंदे, मंडळाचे उपाध्यक्ष निरंजन नलावडे, सरचिटणीस रवींद्र पाष्टे व कार्याध्यक्ष निशिकांत शिंदे, कोषाध्यक्ष विश्वनाथ सकपाळ यांनी पुढाकार घेत केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचे ठरविले.

केदारनाथ मंदिराचा हा देखावा कलादिग्दर्शक राकेश विश्वकर्मा व मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे. यापूर्वीसुद्धा मंडळाने बारा ज्योर्तिलिंगापैकी एक भीमाशंकर मंदिर व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी येथील गणपती पुळे गणेश मंदिर उभारले होते.