
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजनल शिवसेनेला कमी लेखण्यासाठी खोटे डायलॉग लिहून धर्मवीरांच्या प्रतिमेचा वापर सिनेमात करायचा ही एकनाथ शिंदे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची भाजप नीती आहे काय? धर्मवीर आनंद दिघे यांनी हे असले उद्योग खपवून घेतले नसते असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक्स पोस्ट करून मिंधेंना फटकारले आहे. केदार दिघे यांनी धर्मवीर पार्ट-2 सिनेमाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे.
धर्मवीर पार्ट-2 सिनेमात आनंद दिघे यांचे पात्र रंगवणारे अभिनेते प्रसाद ओक यांच्या तोंडी शिवसेनाप्रमुखांच्या मूळ शिवसेनेला बदनाम करण्याकरिता काही वाक्य कोंबली आहेत. ज्या शिवसेनेसाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला कमी लेखणारे डायलॉग धर्मवीर पार्ट-2 चित्रपटात लिहिण्यात आले आहेत. मूळ शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी धर्मवीरांच्या प्रतिमेचा वापर शिंदे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे या सिनेमाच्या माध्यमातून करत आहेत का, ही त्यांची भाजप नीती आहे का, असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.
सिनेमातील संवादाचा दिघेंच्या मूळ आयुष्याशी काय संबंध?
धर्मवीर पार्ट-2 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेले संवाद यांचा दिघेसाहेबांच्या मूळ आयुष्याशी काय संबंध, असाही प्रश्नही केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. या चित्रपटाच्या हेतूवरच केदार दिघे यांनी प्रश्न उपस्थित करत चुकीचे संवाद धर्मवीर आनंद दिघे यांच्या तोंडी टाकून शिंदे स्वतःच्या मार्केटिंगसाठी त्यांची प्रतिमा मलिन करत आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या ओरिजनल शिवसेनेवर हल्लाबोल करण्यासाठीचे डायलॉग लिहून… दिघे साहेबांच्या प्रतिमेचा वापर चित्रपटात करायचा ही शिंदे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंची भाजप नीती आहे का? असले उद्योग दिघे साहेबांनी खपवून घेतले नसते!”
– केदार दिघे