इमारत माफियांवर कठोर कारवाई करा! शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट

kdmc-shiv-sena-take-strict-action-against-building-mafia-shiv-sena-delegation-demands

कल्याण-डोंबिवली तसेच दिवा शहरात ११९ बेकायदा इमारती उभारणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. यासंदर्भात ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत ६५ तर दिव्यात ५४ बेकायदा इमारती उभ्या असून दोषींवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे साकडे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना घातले आहे.

महारेराचा बोगस नोंदणी क्रमांक मिळवलेल्या ६५ इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १७फेब्रुवारी रोजी दिले. त्यापैकी ६ इमारती आधीच पाडल्या आहेत. साडेसहा हजार रहिवासी बेघर झाले असून त्यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी राहिली आहे.

विशेष तपास पथक नेमा

भूमाफिया, विकासक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार करून नागरिकांची प्रचंड फसवणूक केली. ही फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना कडक शासन करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची बुधवारी भेट घेतली. फसवणूक झालेल्यांना न्याय मिळावा याकरिता विशेष तपास पथक नेमण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन करा!

ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांवर गेली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अमली पदार्थ राजरोसपणे विकले जात आहेत. सध्या दिवा पोलीस ठाण्यात केवळ २५ ते ३० पोलीस आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी शिवसेनेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

■ भविष्यात अशा प्रकारची फसवणूक कोणाचीही होऊ नये यासाठी महसूल व महापालिका प्रशासन यांनी समन्वय साधण्याची आवश्यकता असून त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

■ शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनी कल्याण-डोंबिवली व दिव्यातील बेकायदा बांधकामांबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.

■ कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विजय देसाई, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, सचिन पाटील, विजय कदम, लहू चाळके, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, रवींद्र सुर्वे, कळवा शहर संघटक कल्पना कवळे, मुंब्रा शहर संघटक शाहीन घडीयाली, उपशहरप्रमुख अनिश कुरेशी