Kalyan News- सावधान! दूषित पाण्याने अख्खी सोसायटी पडली आजारी

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणीपुरवठा झाल्याने अख्खी सोसायटी आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. या सोसायटीला गेल्या 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे रहिवाशांना उलट्या, जुलाब, टायफाईड व पोटाचे आजार झाले आहेत. याबाबत महापालिकेकडे दोन वेळा पत्रव्यवहार करूनही कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

कल्याणच्या चिकनघर परिसरातील नव एव्हरेस्ट ही सोसायटी असून त्या सोसायटीत एकूण 72 घरे आहेत. मात्र या दूषित पाण्यामुळे सोसायटीला सर्व रहिवाशांची प्रकृती बिघडली आहे. काहींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रहिवाशांनी दिलेली तक्रार प्राप्त झाली असून कर्मचाऱ्यांनी सोसायटीला भेट दिली आहे. या सोसायटीच्या पाण्याचे नमुने महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतले असून त्याची चाचणी सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दूषित पाण्याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली.