>> सौरभ सद्योजात
We go through these metamorphisms just like a caterpillar does before becoming a butterfly and the middle of that metamorphosis it always feels uncomfortable.
फ्रां झ काफ्का यांची ‘मेटामॉर्फसिस’ ही कादंबरी प्रकाशित होऊन आता 110 वर्षे पूर्ण होतील. आजही जगभरात ही कादंबरी वाचणारा, त्या कथानकाचे अर्थशोधन करणारा मोठा वाचकवर्ग आहे. आकाराने ही कादंबरी लहानशी असली तरी काफ्का यांनी याद्वारे मांडलेल्या संकल्पना, सांकेतिक अर्थ हे खोलवर प्रवास करणारे आहेत. मेटामॉर्फसिस म्हणजे कायापालट. एका सकाळी ग्रेगर साम्सा नावाच्या व्यक्तीचं शरीर एका मोठय़ा कीटकात रूपांतरित होतं आणि त्याच्या जगण्याचाही कायापालट होतो. या कादंबरीत काफ्का यांनी एकाकीपण, वडील आणि मुलाचं नातं, अॅब्सर्डिटी व अक्षमता अशा संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून हे लिखाण केल्याचं दिसतं.
ग्रेगर कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, कर्जाची रक्कम फेडण्यासाठी काम करणारा एक सामान्य व्यक्ती असून त्याचं एकाएकी एखाद्या कीटकात रूपांतर होणं इथूनच कादंबरीची सुरुवात होते. परंतु सबंध कथानकात अशी अतिवास्तववादी घटना यानंतर येत नाही. काफ्का यांची ओळख ही अस्तित्ववादी लेखक म्हणून आहे आणि ग्रंथाची रचनाही पुढे त्याच वैचारिक अधिष्ठानावर झाल्याचं दिसून येतं. घरासाठी पैसे कमावून आणणारा ग्रेगर आता त्याच कुटुंबावरचं ओझं बनून राहतो. हा बदल झाल्यानंतर ग्रेगरच्या कीटकरूपी शरीराचा दुस्वास केला जाणे, संतापलेल्या वडिलांनी त्याला इजा पोहोचवणे आणि त्याच्या खोलीचा कबाडखाना होणे अशा काही प्रसंगांतून त्याचे घटत जाणारे महत्त्व व अस्तित्व याला काफ्का यांनी अप्रतिम पद्धतीने अधोरेखित केले आहे. म्हाताऱया आणि असहाय वडिलांना पोटापाण्यासाठी पुनश्च कामावर जायला लागल्याने त्यांचे व ग्रेगरचे संबंध बिघडतात. संतापात ते त्याचं शरीर अधू होईल अशी इजा त्याला पोहोचवतात. यातून पिता-पुत्र संबंधातील मेख लक्षात येऊ शकते. काफ्का यांचे त्यांच्या पित्याशी असणारे तणावपूर्ण संबंध हा धागा इथे जोडता येतो. सुरुवातीस कीटकरूपी ग्रेगरची काळजी घेणारी त्याची बहीण बदलत जाते आणि एखादं झुरळ झटकून टाकावं तसं ती त्याला झटकते. वडिलांनी केलेल्या शारीरिक इजेनंतर हा मानसिक धक्का त्याला अधिक जिव्हारी लागून त्याचं देहावसान होतं.
काफ्का यांनी अचानकपणे येणारं एकाकीपण, विनाअट प्रेम न करू शकणारे लोक आणि केवळ बाह्य सौंदर्यावर प्रेम करणाऱया समाजाचा भयावह आरसा यात दाखवला आहे. ग्रेगरचं शरीर कीटकाचं असलं तरी त्याच्या आतील अस्तित्व हे माणसाचंच असतं. पण त्याचं बाह्य सौंदर्य लुप्त होऊन तो जेव्हा निकामी होतो, तेव्हा तो अनावश्यक ठरतो. भार होऊन राहतो. त्याचं कुटुंब परिवर्तित होतं. त्यांच्या वृत्तीचा त्याच्या शरीराप्रमाणेच कायापालट होतो. हे परिवर्तन किंवा कायापालट या कथानकात अतिशय महत्त्वाची जागा व्यापते. यातून मानवी वृत्ती, माणुसकीचं पतन आणि स्वार्थ अशा कठोर वास्तवाचं प्रकटीकरण होतं. स्नेह ही सशर्त भावना असल्याचं हे उदासवाणं सत्य, वाचणाऱया व्यक्तीस अस्वस्थ करू पाहतं. ग्रेगरचा एकाकी आणि शांत मृत्यू होतो व त्याचं कुटुंब त्यांच्या पुढील आयुष्याच्या योजनेत व्यस्त होतं. आपला मुलगा नव्हे तर एखादं झुरळ मरून पडल्यासारखं वाटावं इतक्या सहज ते पुढे सरकतात. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे’ इतकीही सहानुभूती साम्सा कुटुंब दाखवत नाही. कारण मानवी स्वभावाचं नातं शरीरापल्याड न गेल्याचं ते दुर्दैवी दर्शक आहे. कीटकाच्या आत आपला पूर्वीचा मुलगा वास करून आहे हे सत्य समोर असूनही डोळेझाक होते, हे मानवतेचं पतन व सशर्त प्रेम काफ्का अधोरेखित करतात. ग्रेगरच्या शरीराचं रूपांतरण दाखवत त्याद्वारे बदलत गेलेले अशक्त नातेसंबंध, सामाजिक तिरस्कार आणि एकाकीपणाची भावना मांडताना त्यांनी अगदी मूलभूत वर्तणुकीवर भाष्य केलं आहे. कित्येक माणसे ही केवळ शरीराने माणसे असून ती केवळ किडय़ामुंग्यांसारखी जगतात. निकामी ठरली की, प्रेमास अपात्र ठरतात आणि एकटी टाकली जातात हे दाहक वास्तव मांडत काफ्कांनी एकाअर्थी सावधच केलं आहे. व्यक्तीचं मूल्य हे केवळ आर्थिक आणि सामाजिक योगदानाच्या आधारे ठरवणारा समाज कित्येक मर्यादांनी बांधलेला असून त्यात असणारी मानव्याची कमतरता ही एका ठसठसणाऱया जखमेहून वेगळी नाही. हे भयावह वास्तव जितकं लवकर स्वीकारू तितका सुधारणेला वाव निर्माण होईल अशी किमान आशा बाळगण्यास काय हरकत आहे?
[email protected]
(लेखक इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)