कविता राऊतची राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात धाव, सावरपाडा एक्स्प्रेसला हवंय उपजिल्हाधिकारी पद

सावरपाडा या आदिवासी पाड्यावरील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरही ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली कविता राऊत नाराज आहे. मला ललिता बाबरप्रमाणे उपजिल्हाधिकारी पद मिळायला हवं असं तिचं म्हणणं आहे. या अन्यायाविरुद्ध आपण राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही तिने दिला आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाबरोबरच महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंची राज्य शासनाने सरकारी नोकरीत थेट नियुक्ती केली. कविता राऊत हिच्यासह 15 जणांना सरकारी नोकरीत मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे, मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहेत.

कविता राऊत म्हणाली, 10 वर्षांपासून संघर्ष करूनही मला न्याय मिळत नाहीये. माझ्याबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या ललिता बाबरला एक न्याय आणि मला दुसरा का? असा सवाल पुन्हा एकदा कविता राऊतने उपस्थित केलाय. दहा वर्षांपासून अनेक खात्यात नोकरीची फाइल पुढे जाते, मात्र अर्थ खात्यात फाइल अडवली जात असल्याचा गंभीर आरोपही तिने केलाय. त्यामुळे आपण राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे, असेही तिने सांगितले.

‘मला आता देण्यात आलेले सरकारी नोकरीतील पद हे 2018 च्या जीआरनुसार आहे, मात्र आमचे प्रकरण त्याआधीचे असल्यानं जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे,’ अशी अपेक्षाही ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त कविता राऊतने व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार हे प्रकरण कसे हाताळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.