अभिप्राय : सकारात्मक दिव्यदृष्टी

>>अस्मिता येंडे

दैहिक इंद्रियांचे मानवी जीवनातील स्थान महत्त्वाचे आहे. दृष्टिबाधित, अपंग असूनही आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून सकारात्मकतेने आणि जिद्दीने स्वतच्या पायावर उभे राहून समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या अंध व्यक्तींच्या संघर्षगाथा लेखिका अनुजा संखे यांच्या ‘कवडसे’ या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. या लेखमालेत एकूण 25 लेख असून प्रेरक विचार प्रकट करणारे आहेत.

लेखिका अनुजा संखे या स्वत अंध असून त्यांनी स्वतविषयी न लिहिता आपल्या इतर बांधवांच्या जगण्यातील संघर्ष, आलेल्या अडचणी, करावी लागणारी धडपड, आसपासच्या व्यक्तींनी केलेले मानसिक खच्चीकरण आणि त्यावर केलेली मात, या लेखमालेतून अगदी ओघवत्या शैलीत मांडले आहे. प्रत्येक लेखाचे शीर्षकही तितकेच मनोवेधक आहे. लेखिका अनुजा संखे यांनी सुरुवातीला विविध माध्यमातून अशा प्रेरणादायी व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्याशी संपर्क साधून मुलाखती घेऊन त्या लेखस्वरूपात शब्दबद्ध केल्या आहेत.

अंधत्वावर मात करत माइक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणारी अदिती शहा, साहित्यप्रेमी शशिधरन कृष्णन, अंध-अपंगांसाठी रोजगारनिर्मिती करणारे किशोर गोहिल, वकील सचिन चव्हाण, नंदिता दुबे, भाग्यश्री जाधव, संगीतात रमणारे किरण विणकर, डॉ. अनिल अनेजा, स्वयंपाक करून व्यवसाय करणाऱया वनिता हरिया आणि अंजली जमाले, सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक, वॉइस ओवर आर्टिस्ट आर.जे. कृती बंगा अशा अनेक प्रेरक व्यक्तींचा परिचय यात आहे.

अंध-अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱया संस्था आणि व्यक्तिमत्त्वाचे कार्यही या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळते. ब्रेल लिपीतून ‘स्पर्शज्ञान’ पाक्षिक चालवणारे स्वागत थोरात, ब्रेल लिप्यांतरण करणाऱया सुखदा बाळकुंदरी, ब्रेल लिपीतील कागदपत्रे जतन करणारे अरविंद पुरंदरे अशा अनेक व्यक्तींचे कार्यही लेखिकेने वाचकांपर्यंत पोहवचले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा एक आशेचा किरण दिसतो तो किरण म्हणजे हे ‘कवडसे’ आहेत. या कवडशांनी इतरांचे जीवन नक्कीच उजळून निघेल, यात शंका नाही.

 लेखिका ः अनुजा संखे
 प्रकाशक ः शारदा प्रकाशन
 मूल्य ः 200 रुपये