नवरदेवाशिवाय लागली लग्नं! 20 हून अधिक नवरींना मिळालं मॅरेज सर्टिफिकेट, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत घोळ

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेमध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात तब्बल 20 हून अधिक मुलींचा विवाह नवरदेवाशिवायच लावून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयजीआरएसच्या माध्यमातून एका तक्रारदाराने समाज कल्याण मंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे. त्याने दावा केला आहे की, 10-10 हजारांची लाच घेऊन नवरदेवाशिवायच मुलींचे लग्न लावून दिले आणि त्यांना प्रमाणपत्रही दिले.

कौशांबीच्या डीएम मधुसूदन हुलगी यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत तपासाचे आदेश दिले आहेत. याशिवाय आरोप सिद्ध झाल्यास फसवणुकीत सहभागी असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आले आहे. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंगर्गत 23 नोव्हेंबर रोजी सिरथू तहसीलमधील मिठेपूर सायरा येथील बाबू सिंह पदवी महाविद्यालयात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये दोनशेहून अधिक मुलींचे लग्न लावण्यात आले होते. कडा ब्लॉकमधील सायरा मिठेपूर, अंडावा, शहजादपूर आणि सिरथू ब्लॉकमधील कोखराज, बिदानपूर, भदवा आदी गावांतील वधू-वरांनी सामूहिक विवाह कार्यक्रमात सहभाग घेतला.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह कार्यक्रमामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्मराज मौर्य, राज्य महिला आयोगाच्या सदस्य प्रतिभा कुशवाहा, सिरथू ब्लॉकचे प्रमुख प्रतिनिधी लवकुश मौर्य यांच्यासह जिल्ह्यातील उच्च पदाधिकारी सहभागी झाले होते. तक्रारकर्ते डीएस मौर्य यांनी IGRS पोर्टलद्वारे समाज कल्याण राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 20 पेक्षा अधिक मुलींचे नवरदेव हे सामूहिक विवाह कार्यक्रमात आले नव्हते. मात्र, सिरथू आणि कडा ब्लॉकचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन लग्न लावून दिले. गरीब मुलींच्या लग्नाच्या फायली सहायक विकास अधिकारी दलालांच्या माध्यमातून तयार करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्येक जोडप्याकडून 3 ते 5 हजार रुपयांचा निधी जमा केला जातो. ज्या मुलींचे नवरदेव परदेशात पैसे कमवायला जातात आणि लग्न समारंभाला उपस्थित राहू शकत नाहीत अशा मुलींकडून प्रत्येकी 10 हजार रुपये इतकी मोठी रक्कम आकारली जाते. या संपूर्ण प्रकरणी डीएम मधुसूदन हुलगी यांनी सांगितले की,जर असे प्रकरण समोर आले असेल तर आम्ही ते पुन्हा तपासू. जितक्या लोकांचे लग्न झाले आहे त्याच क्रमाने विभागाकडून पैसे दिले जातील.