अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वंशाचे कश्यप पटेल यांच्याकडे ‘एफबीआय’ अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात कश्यप पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत.
तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानतंर आता पटेल हे ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनात अत्यंत महत्त्वाची संधी मिळालेले दुसरे हिंदुस्थानी-अमेरिकन ठरले आहेत.
कश्यप एक हुशार वकील, इन्व्हेस्टिगेटर आणि अमेरिका फर्स्ट फायटर आहेत. त्यांनी आपली कारकीर्द भ्रष्टाचार उघड करणे, न्यायाचे रक्षण करणे आणि अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करण्यात घालवली. त्यामुळे कश्यप पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे पुढील संचालक म्हणून काम करतील हे जाहीर करताना प्रचंड अभिमान वाटत असल्याची भावना डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘टूथ सोशल’वर पोस्ट करत व्यक्त केली आहे.
सीआयएचे प्रमुख म्हणून होती चर्चा
वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात कश्यप पटेल यांचे नाव ‘सीआयए’ अर्थात सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख म्हणून चर्चेत होते, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदावर त्यांचे जवळचे सहकारी जॉन रॅटक्लिफ यांची नियुक्ती केली. पटेल यांच्या नावाची घोषणा करतानाच ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या हिस्लबरो काऊंटीचे शेरीफ चॅड क्रोनिस्टर यांची ड्रग एन्पर्ह्समेंट एजन्सीचे प्रमुख म्हणून नेमणूक केल्याची घोषणाही केली.
कश्यप पटेल यांची दमदार कामगिरी
कश्यप पटेल यांनी संरक्षण विभागात चीफ ऑफ स्टाफ, डेप्युटी डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दहशतवादविरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम केले. काश यांनी 60 हून अधिक ज्युरी ट्रायल्सदेखील घेतल्या आहेत. दरम्यान, पटेल हे अॅटर्नी जनरल पाम बॉडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी पटेल यांच्या नावाची घोषणा केली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील सिनेटने मंजुरी दिल्यानंतरच त्यांच्या पदाची निश्चिती होणार आहे.