कश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तान नेहमीच जम्मू-कश्मीरातील लोकांच्या हक्कांच्या बाजूने उभा राहिला आहे. भविष्यातही आम्ही कश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्टय़ा पाठिंबा देत राहू, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. आज पाकिस्तानात कश्मीरमधील लोकांसाठी आत्मनिर्णय दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शाहबाज शरीफ पुढे म्हणाले, आजच्याच दिवशी 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जम्मू-कश्मीरमध्ये मुक्त आणि निष्पक्ष सार्वमताची हमी देणारा ऐतिहासिक ठराव स्वीकारला होता. आत्मनिर्णयाचा अधिकार हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे मुख्य तत्त्व आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभा दरवर्षी आत्मनिर्णयाच्या कायदेशीर हक्काचे समर्थन करण्यासाठी ठराव मंजूर करते. कश्मीरमधील लोकांना सात दशकांपासून हा अधिकार वापरता आलेला नाही हे दुर्दैव आहे, असे शरीफ म्हणाले.
कश्मिरींना अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करावे
आता वेळ आली आहे की, संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे आणि जम्मू तसेच कश्मीरमधील लोकांना त्यांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा वापर करता येईल त्यादृष्टीने पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन शरीफ यांनी केले. मानवाधिकारांचे उल्लंघन ताबडतोब थांबवावे आणि राजकीय पैद्यांची सुटका करावी तसेच कश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जम्मू-कश्मीरवर पकड मजबूत करण्यासाठीच 370 रद्द
जम्मू आणि कश्मीरवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी भारत अनेक कठोर पावले उचलत आहे. त्याची सुरुवात हिंदुस्थान सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यापासून झाली, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानच्या सरकारी रेडिओनुसार पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही त्यांचा देश कश्मिरी जनतेला राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पांठिबा देत राहील याचा पुनरुच्चार केला.