कशेडी बोगदा म्हणजे मृत्यूचा सापळा; माजी खासदार विनायक राऊत यांचा खळबळजनक आरोप

कशेडी घाटातील बोगद्याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रत्नागिरीत केली. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार पंतप्रधानांकडे केली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

कशेडी बोगद्याचे काम देताना ते बोगद्याच्या कामाचा फारसा अनुभव नसलेल्या रिलायन्सला दिला. रिलायन्सने हे काम शिंदे डेव्हलपर्सला दिले. शिंदे डेव्हलपर्स ही केंद्रातील एका मंत्र्याची लाडकी कंपनी असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी एक वर्षांपासून कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाबाबत आवाज उठवत आहे. वारंवार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. कशेडी बोगद्याचे काम इतके निकृष्ट आहे की पावसाळ्यात बोगद्यात पाण्याचे धबधबे सुरू आहेत. बोगद्याच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात कशेडी बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच कशेडी बोगद्याची पाहणी करणे गरजेचे आहे. कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाची तक्रार मी जुलै महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असे राऊत यांनी सांगितले.

मुख्य अभियंत्याचे उत्तर धक्कादायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर सीव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्य अभियंत्याने दिलेले उत्तर हे धक्कादायक आहे. मुख्य अभियंत्याने सांगितले की कशेडी बोगद्याच्या वर विहिरी आहेत. त्याचे पाणी बोगद्यातून झिरपते. कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या अनेक बोगद्यांवर विहिरी आहेत. पण त्याचे पाणी कधी बोगद्यांमध्ये येत नाही. मग कशेडीतल्या विहिरीचे पाणी बोगद्यामध्ये कसे येते? असा सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. तसेच कशेडी बोगद्यावर विहिरी होत्या, मग त्याची उपाययोजना त्यावेळी का केली नाही, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.