पंचगंगेतील प्रदूषण रोखण्याचा दिखावा नको, कार्यवाही करा; करवीर शिवसेनेकडून अधिकारी धारेवर

पंचगंगा नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच असून, प्रशासकीय अधिकाऱयांकडून फक्त बैठकीचा दिखावा होत आहे. त्यात पंचगंगा नदीकाठी असणाऱया गावांतील ओढे व नाले, गटारी, प्लॅस्टिकसह इतर कचऱयाने तुडुंब भरलेल्या आहेत. याची प्रशासनाला जाणीव करून देत पावसाळ्यापूर्वी हा कचरा साफ करून पंचगंगा नदी प्रदूषण होण्यापासून थांबवावी, अशी मागणी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्याकडे करण्यात आली.

पंचगंगा नदीकाठच्या गावातील ओढे, नाले, गटारी साफ करण्याबाबत सूचना संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात येतील. बेकायदेशीर प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. यासह 28 मे ला हार्ंडग्जवाल्यांनी मागितलेली मुदत संपली असून, आता विनापरवाना हार्ंडग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नसेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन कार्तिकेयन एस. यांनी दिले.

गेल्या 8-10 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन ग्रामीण भागातील अवैध हार्ंडग्जसह पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व गटविकास अधिकाऱयांच्या संयुक्त बैठकीत सूचना करण्यात आल्या. पण ग्रामीण भागातील ग्रामविकास अधिकाऱयांनी कोणत्याही प्रकारची अवैध हार्ंडग्ज असतील वा पंचगंगा नदी प्रदूषित करणारे ओढे, नाले, गटारी आदी साफ करण्याबाबत कोणतीही कारवाई ग्रामपंचायत पातळीवर केलेली नाही. विभागीय आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचा आरोप करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केला.

दरम्यान, बंदी असलेल्या प्लॅस्टिकने संपूर्ण ओढे, नाले, गटारी तुडुंब भरल्या असून, ग्रामविकास अधिकाऱयांना आदेश करून ते साफ करण्यात यावेत. या प्लॅस्टिकमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी विभागप्रमुख बाबुराव पाटील व आदी पदाधिकारी उपस्थित होते.