श्रीलंकन अखिलच्या माऱ्यापुढे सुल्तान गारद, कर्नाटकचा हॉस्पेट संघाची उपांत्य फेरीत धडक

टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषकाच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकन गोलंदाज अखिलच्या जादुई गोलंदाजीमुळे कर्नाटकच्या एफ. एम. हॉस्पेट संघाने केरळच्या सुल्तान ब्रदर्स पायरट्सचा 8 विकेट राखून पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली.

सांताक्रुझच्या एअर इंडिया मैदानावर सध्या टेनिस क्रिकेटचा थरार सुरू आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकन स्टार बॉलर अखिलने उपांत्यपूर्व फेरीत 1 मेडन ओव्हर टाकतानाच अवघ्या 4 रन्समध्ये 2 विकेट घेतल्यामुळे केरळच्या सुल्तान ब्रदर्स पायरट्स संघाला 8 ओव्हरमध्ये 8 विकेटच्या मोबदल्यात 56 धावा करता आल्या. कर्नाटकच्या हॉस्पेट संघाने हे आव्हान लीलया पेलत दीड षटके आणि 8 विकेट शिल्लक ठेवून शानदार विजय मिळवित दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. हॉस्पेटतर्फे प्रथमेश पवारने 11 बॉल्समध्ये 20 धावा केल्या. हॉस्पेटच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अखिलला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरविण्यात आले. कर्नाटकच्या एफ. एम. हॉस्पेटसोबत आता पुण्याच्या डिंगडॉग आणि मुंबईच्या बालाजी क्लबने स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांचा आज गौरव

सुप्रिमो चषकाची अंतिम फेरी उद्या, रविवारी होणार आहे. या वेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते विजेत्यांना गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 12 लाख आणि 11 बाईक्स, तर उपविजेत्या संघाला 10 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाला प्रत्येकी एक बाईक, तर ‘मॅन ऑफ द सीरिज’ जिंकणाऱ्या खेळाडूला मारुती कार दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सहभागी खेळाडूला सन्मानचिन्ह आणि किट बॅग देण्यात येणार आहे.

पहिल्या फेरीत कर्नाटकच्या एफ. एम. हॉस्पेट संघाने किरण पवारच्या 23 चेंडूंतील 37 धावांच्या खेळीच्या जोरावर चुरशीच्या लढतीत डोंबिवलीच्या शांतीरत्न संघाचा पाच विकेटने पराभव केला. शांतीरत्न संघाने 8 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 69 धावा केल्या. हॉस्पेट संघाने सामनावीर ठरलेल्या किरण पवारच्या जिगरबाज खेळाच्या जोरावर एक चेंडू शिल्लक ठेवून हे आव्हान पार केले. किरण पवारने आपल्या शानदार खेळीत 1 षटकारासह 4 चौकार वसूल केले.

सुल्तान ब्रदर्स पायरट्सने पहिल्या फेरीत रायगडच्या ट्रायडेंट मयूर इलेव्हन संघाचा 24 धावांनी पराभव केला. सामनावीर ठरलेल्या रोशनच्या 21 चेंडूंतील 36 धावांच्या जोरावर 8 ओव्हरमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यात 77 धावा केल्या. रोशनने 1 चौकारासहित एकूण 4 षटकारांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरादाखल रायगडचा ट्रायडेंट मयूर इलेव्हन संघ 8 षटकांत 7 विकेटच्या मोबदल्यात 53 धावाच करू शकला.