पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; सारे हळहळले

कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपली पहिली पोस्टिंग घेण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. हर्षवर्धन असे त्यांचे नाव आहे. हर्षवर्धन हे मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील रहिवासी होते. हासन जिल्ह्यातील किट्टानेजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

हर्षवर्धन हे कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. या वर्षी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन हे होलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी असिस्टंट पोलीस अधिक्षक म्हणून ड्युटीसाठी हसन येथे जात होते. मात्र प्रवासादरम्यान हर्षवर्धन यांच्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या अपघाचात हर्षवर्धन गंभीर जखीम झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे.

आयपीएस अधिकाऱ्याने अलीकडेच म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि हसन जिल्ह्यात एएसपी म्हणून नियुक्ती केली होती. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हर्षवर्धन यांचे वडील उपविभागीय दंडाधिकारी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.