
कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली निष्पाप पतीला वर्षे तुरुंगात काढाली लागली, ती पत्नी तीन वर्षांनंतर रेस्टॉरंटमध्ये जेवताना सापडली. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. बेट्टाडापुरा पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत म्हैसूर न्यायालयात हजर केले.
कोडगु जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्यातील बसवनहल्ली येथील रहिवासी असलेल्या सुरेशची पत्नी मल्लिगे 2021 मध्ये बेपत्ता झाली. सुरेशने मल्लिगे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यानंतर पोलीस मल्लिगेचा शोध घेत होते.
एक वर्षानंतर म्हैसूर जिल्ह्यातील बेट्टाडापुरा पोलीस स्टेशन हद्दीत सांगाड्याचे अवशेष सापडले. हा मल्लिगेचा सांगाडा असल्याचे समजून पोलिसांनी सुरेश आणि त्याची सासू गौरी यांना डीएनए जुळत नसतानाही मल्लिगेचे अवशेष असल्याचे मानण्यास भाग पाडले. या चुकीच्या ओळखीच्या आधारे सुरेशला अटक करत पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला.
खोट्या आरोपाखाली सुरेश जवळजवळ दोन वर्षे तुरुंगात होता. न्यायालयाने दिलेल्या डीएनए चाचणीत हे अवशेष मल्लिगेचे नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर सुरेशला जामीन मंजूर करण्यात आला आणि त्याची सुटका झाली.
सुरेशचे मित्र गुरुवारी मडिकेरी येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आणि या कहाणीत खरा ट्विस्ट आला. सुरेशच्या मित्रांना त्या रेस्टॉरंटमध्ये मल्लिगे जिवंत आणि ठणठणीत जेवताना दिसली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. बेट्टाडापुरा पोलिसांनी तात्काळ रेस्टॉरंटमध्ये दाखल होत तिला ताब्यात घेतले. यानंतर मल्लिगेला म्हैसूर न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी तपासात केलेल्या निष्काळजीपणावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. मल्लिगेच्या गेल्या तीन वर्षांतील हालचाली आणि या घटना कशा घडल्या याचा पोलीस तपास करत आहेत.