देशात गायींची तस्करी करणे गुन्हा असूनही तिची वेगवेगळ्या पद्धतीने तस्करी करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या वाटा अवलंबताना दिसतात. अशातच उत्तर कन्नड जिल्ह्यात अलिकडे गायी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच होन्नावरजवळ एका गर्भवती गाईची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सगळीकडे संताप पसरला आहे. अशातच कर्नाटकचे मंत्री मंकल वैद्य यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांना अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना भर रस्त्यावर गोळ्या घालाव्यात, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा आदेश देत तस्करांना इशाराच दिला आहे.
मंकल एस वैद्य पुढे म्हणाले की, अशाप्रकारच्या कृत्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही. प्रशासन गायी आणि गाय मालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे आश्वासन दिले आहे. गायींची चोरी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आम्ही गायींची पूजा करतो. तिचा आदर करतो आणि प्रेमाने पालन करतो. शिवाय तिचे दूध पिऊन मोठे झालो आहोत. हे थांबले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत असे पुन्हा होता कामा नयेस असा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
माध्यमांशी बोलताना मंकल वैद्य म्हणाले की, या मागे कोणीही असो त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची गय केली जाणार नाही. गरज पडल्यास गायींची तस्करी करणाऱ्यांवर भर रस्त्यात गोळी घाला असे आदेशच दिले आहेत.