केंद्रीय मंत्र्यांसह 48 नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत; सीडी, पेनट्राईव्हही बनलेत, कॅबिनेट मंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षाचे तब्बल 48 नेते हनीट्रॅपमध्ये अडकले असून या सर्वांचे सीडी आणि पेनड्राईव्हही बनले आहेत, असा गौप्यस्फोट करत कॅबिनेट मंत्री के.एन. राजन्ना यांनी कर्नाटकसह देशातील राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे.

राजकीय व्यक्ती हनीट्रॅपमध्ये अडकल्याच्या घटना याआधीही समोर आल्या होत्या. आता याच मुद्द्यावरून कर्नाटकातील राजकारणात घमासान सुरू आहे. गुरुवारी कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली यांनी राज्यातील एका वरिष्ठ मंत्र्याला दोन वेळा हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असा गौप्यस्फोट केला. याला कॅबिनेट मंत्री के.ए. राजन्ना यांनीही दुजोरा देत आपल्यासोबत हा प्रकार घडल्याचे सांगितले.

विविध राजकीय पक्षांमधील जवळपास 48 नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून हे प्रकरण फक्त कर्नाटकपुरते मर्यादित नाही. राष्ट्रीय पातळीवरील अनेक पक्षातील नेत्यांचाही यात समावेश आहे, असे के.एन. राजन्ना यावेळी म्हणाले. के.एन. राजन्ना यांचा मुलगा आमदार राजेंद्र राजन्ना यांनीही या आरोपांवर भाष्य केले.

मला आणि माझ्या वडिलांना यात अडकवण्याचा गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे. आम्हाला फोन कॉल, व्हिडीओ कॉल यायचे. सुरुवातीला आम्हाला हे सामान्य वाटले, मात्र नंतर दिवसेंदिवस कॉल वाढतच गेल्यानंतर आम्ही हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत चौकशीची मागणी केली, असे ते म्हणाले. दरम्यान, हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरम यांनी याची उच्च स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेस, भाजप, जेडीएससह…

कर्नाटकमध्ये हनीट्रॅपची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएससह सर्वच पक्षाचे नेते हनीट्रॅपमध्ये फसले आहेत. काही लोक राजकीय लाभासाठी याचा फायदा घेत आहेत, असे मंत्री सतीश जारकीहोली म्हणाले. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सी.टी. रवी यांनीही हनीट्रॅपचा मास्टरमाइंड कोण? असा सवाल करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष पथकाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.