Karnataka: आठवड्यात थकबाकीचे पैसे न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा, KEONICS चं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र

कर्नाटक स्टेट इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (केओनिक्स) शी संलग्न 450 हून अधिक विक्रेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, जर त्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पैसे आठवडाभरात मंजूर झाले नाही तर सामूहिक आत्महत्येची धमकी दिली आहे.

दीड वर्षांहून अधिक काळ पेमेंटची वाट पाहणारे विक्रेते मोठ्या आर्थिक संकटात आहेत, सहा हजाराहून अधिक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पत्रात, विक्रेत्यांनी सरकारवर छळ आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांचा आरोप आहे की मागील सीईओने 12 टक्के लाच मागितली होती आणि जेव्हा नकार दिला तेव्हा त्यांनी त्यांचे पैसे रोखले. आयटी मंत्री प्रियांक खर्गे आणि केओनिक्सचे अध्यक्ष शरथ बच्छे गौडा यांच्यासह अधिकाऱ्यांना अनेक महिने मागणी करूनही, परिस्थिती बदलेली नाही.

या पत्रात, असोसिएशनने विशेषतः आयटी मंत्री, केओनिक्सचे अध्यक्ष, सीईओ पवन कुमार मल्लपट्टी आणि वित्त संचालक निशीथ यांना या आर्थिक संकटासाठी जबाबदार धरले आहे. तसेच अशा परिस्थितीमुळे होणाऱ्या कोणत्याही मृत्यूसाठी ते जबाबदार असतील असा इशारा दिला आहे.

विक्रेत्यांनी केओनिक्सने आणलेल्या नवीन पात्रता नियमांवरही टीका केली, दावा आहे की ते वर्षानुवर्षे महामंडळाचा कणा असलेल्या लहान विक्रेत्यांपेक्षा मोठ्या कंपन्यांना पसंती देतात.

‘आर्थिक अडचणींमुळे अनेक विक्रेते आत्महत्येच्या विचारात आहेत’, असे असोसिएशनच्या पत्रात म्हटले आहे. ‘पेमेंटमध्ये विलंब आणि नवीन नियमांमुळे आमचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही आमचे पेमेंट त्वरित जारी करण्याची विनंती करतो, अन्यथा आम्हाला कठोर पर्याय स्वीकारायला भाग पाडले जाईल’, असा इशारा देण्यात आला आहे.

केओनिक्स व्हेंडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत के बंगेरा म्हणाले की, 300-350 कोटी रुपये थकीत बिल म्हणून प्रलंबित आहेत. बंगेरा म्हणाले की, जेव्हा असोसिएशनने प्रियांक खरगे यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्यांनी सांगितले की ते ‘काही दिवसात पैसे देतील’, परंतु कधीही पैसे दिले नाहीत.

बंगेरा म्हणाले की, ‘गेल्या दीड वर्षात, जेव्हा सरकार बदलले, तेव्हा त्यांनी आमचे पूर्ण पैसे रद्द केले. आम्ही माजी सीईओ संगप्पा यांच्याकडे दोन-तीन महिने गेलो होतो आणि पैसेही मागितले होते. पण त्यांनी देखील आम्हाला पैसे दिले नाहीत’.

आमच्या कोणत्याही विक्रेत्याने आत्महत्या केली तर सरकार जबाबदार असून एमडी पवन कुमार यांनी सारं उद्ध्वस्त केल्याचा आरोप बंगेरा यांनी केला.

विक्रेत्यांची दुर्दशा होत असताना, केओनिक्स एम्पॅनेल केलेल्या विक्रेते कल्याणकारी संघटनेने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.