मला आई व्हायचंय, सासूला नातवंंडं हवीत! पत्नीची याचिका, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीला हायकोर्टाकडून पॅरोल मंजूर

karnataka-high-court

कर्नाटक उच्च न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोषीला पॅरोल मंजूर केला आहे. दोषीच्या पत्नीने ‘मला आई व्हायचं आहे’, असे म्हणत पतीला पॅरोल मंजूर करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची दखल घेत न्यायमूर्ती एसआर कृष्णा यांनी आरोपीला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, सदर आरोपीच्या पत्नी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मातृसुख मिळावे म्हणून पतीला पॅरोल मंजूर करावा अशी मागणी यात करण्यात आली होती. यावर नुकतीच सुनावणी झाली. याचिकाकर्ता महिलेचा आई बनण्याचा अधिकार लक्षात घेता न्यायालयाने सदर आरोपीला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला.

दोषीच्या पत्नीने केवळ या कारणासाठी पॅरोल हवा होता की तिला आई व्हायचे होते. दोघांचे लग्न 11 मार्च 2023 ला झाले होते. मात्र पती तुरुंगात असल्याने तिला मातृसुखाचा आनंद मिळत नव्हता. आई बनण्याच्या हक्कापासून तिला वंचित ठेवता येणार नाही, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला पॅरोल मंजूर केला.

न्यायालयाने कोलार आनंद या आरोपीला 5 जून ते 4 जुलै 2024 या तीस दिवसांच्या कालावधीसाठी पॅरोल मंजूर केला आहे. खुनाच्या खटल्यामध्ये 2019 मध्ये कोलार आनंद याला ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र 2023 मध्ये उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा 10 वर्षांनी कमी केली. त्यावेळी पॅरोल मंजूर होताच त्याने लग्न केले होते.

पॅरोल संपताच त्याला तुरुंगात जावे लागले होते. मात्र लग्नानंतर त्याच्या पत्नीला मातृसुख हवे असल्याने तिने पॅरोलसाठी याचिका केली. पती तुरुंगात असल्याने मी मुलांच्या हक्कापासून वंचित आहे, असे तिने याचिकेत म्हटले होते. मी सासूसोबत एकटीच राहते. सासू आजारी असून त्यांना नातवंडे हवी आहेत. मलाही मातृसुख हवे आहे. याचा विचार करून न्यायालयाने पतीला पॅरोल मंजूर करावा. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. मात्र आठवड्यातून एकदा पोलिसांसमर हजर राहण्याची अटही घातली.