कर्नाटकमधील कलबुर्गी येथे असमाधानकारक सेवेमुळे नाराज झालेल्या ग्राहकाने ओलाच्या शोरूमला आग लावली. मोहम्मद नदीम (वय – 26) असे तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम याने ओलाची इलेक्ट्रीक गाडी खरेदी केली होती. नुकतीच घेतलेली गाडी वारंवार खराब होत असल्याने त्यानो शोरूमकडे तक्रार केली. मात्र शोरूमकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप नदीम याने केला. मंगळवारी नदीम आणि शोरूममधील अधिकाऱ्यांमध्ये वादाचा भडका उडाला. यामुळे रागाच्या भरात नदीमने पेट्रोल ओतून शोरूमला आग लावली. या आगीमध्ये 6 वाहने आणि संगणक प्रणाली जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मोहम्मद नदीम हा व्यवसायाने मेकॅनिक असून त्याने महिन्याभरापूर्वी 1 लाख 40 हजार रुपये मोजून ओलाची ई-स्कूटर खरेदी केली होती. मात्र खरेदीनंतर एक-दोन दिवसातच स्कूटरच्या बॅटरी आणि साऊंड सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या येऊ लागली. गाडी दुरुस्त करून द्यावी या मागणीसह त्याने वारंवार शोरूमला भेट दिली, मात्र शोरूमकडून त्याच्या तक्रारीचे निराकरण होत नव्हते.
याच रागातून मोहम्मदने पेट्रोल ओतून शोरूमला आग लावली. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये सर्व घटना कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेत शोरूमचे साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आग लावण्यात आली तेव्हा शोरूम बंद होते.