देशातील महागाईला मोदी जबाबदार, कर्नाटकात केंद्र सरकारविरोधात आंदोलन

देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेला आहे, या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ केली. गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली, असा आरोप सिद्धारमय्या यांनी केला. 2014 साली अच्छे दिन आयेंगे अशी घोषणा देणाऱया मोदींनी अच्छे दिन घालवले. 2014 साली सोने प्रति तोळा फक्त 28 हजार रुपये होते. तेच सोने आता 95 हजारांपार गेले आहे. यूपीएच्या काळात चांदी प्रति किलो 43 हजार रुपये होते. परंतु, मोदींच्या काळात चांदी 94 हजारपार गेली आहे. 2014 साली डॉलरच्या तुलनेत रुपया 59 रुपये होता. तो आता 87 रुपयांवर गेला आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आश्वासन दिले होते की, डॉलरच्या बरोबरीने रुपया आणू, कुठे आहे तुमचे आश्वासन. देशात वाढणाऱया महागाईला कोण जबाबदार आहे. देशातील गरीबांचे रक्त कोण शोषून घेत आहे. 2014 साली सिमेंटची 50 किलोची गोणी 268 रुपयांना येत होती. तिची किंमत आता 410 रुपयांवर पोहोचली आहे. 19 हजार रुपये टन मिळणारे स्टिल आता 73 हजार टनवर पोहोचले आहे. पीव्हीसी पाईप 60 रुपये पर युनिट मिळत होता. तो आता 150 वर पोहोचला आहे, असे सिद्धारमय्या म्हणाले.