भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आण सातव्यांदा निवडून आलेले खासदार रमेश जिगाजिगानी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी भारतीय जनता पक्ष दलित विरोधी असल्याचा घणाघात केला आहे.

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्री हे उच्चवर्णीय आहेत. मंत्रीमंडळामध्ये दलितांना विशेष स्थान देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. Ramesh Jigajinagi हे कर्नाटकातील विजयपुरा मतदारसंघातील खासदार आहेत. दक्षिणकडील या राज्यातून सात वेळा ते निवडून आले आहेत. मात्र मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना मंत्रीपदाची इच्छा होती का? असे विचारले असता ते म्हणाले की, मला मंत्रीपद मागायची गरज नाही. लोकांचे समर्थन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु निवडून आल्यानंतर लोकांनी मला जाब विचारला. अनेक दलित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला भाजप दलितविरोधी असून त्या पक्षात प्रवेश करू नका असाही सल्ला दिला होता.

दक्षिण हिंदुस्थानातून सातवेळा निवडणूक जिंकणाला मी एकमेव दलित व्यक्ती आहे. पण सर्व उच्चवर्णीय लोकांना मंत्रीपदं देण्यात आली. दलितांनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता का? माझ्यासाठी हे खुपच वेदनादायक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

कोण आहेत रमेश जिगाजिगानी?

72 वर्षीय रमेश जिगाजिगाने 1998 ला पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून ते सातत्याने निवडणूक जिंकत आले आहेत. 2016 आणि 2019मध्ये त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. मात्र यंदा त्यांची वर्णी लागलेली नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.