महिला मंत्र्यावरील अश्लील टिप्पणी भोवली; भाजप आमदार सी.टी. रवी यांना अटक

महिला मंत्र्यावर केलेली अश्लील टिप्पणी भाजप आमदार व माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांना भोवली आहे. कर्नाटक पोलिसांनी सी.टी. रवी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांनी भाजप आमदार सी.टी. रवी यांच्याविरोधात हिरेबागेवाडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सी.टी. रवी यांच्याविरोधात कलम 75 आणि कलम 79 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री भाजप आमदार सी.टी. रवी यांना बेळगाव येथील सुवर्ण विधान सौध येथून अटक करत पोलीस स्थानकामध्ये नेले. भाजप आमदाराला पोलिसांनी अटक केल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, भाजप आमदार सी.टी. रवी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेसने हेब्बालकर प्रकरणाची तक्रार विधान परिषदेच्या सभापतींकडे केली आहे.