
मोठय़ा शहरांमध्ये विनयभंग, छेडछाडीसारख्या घटना होतच असतात. असे असले तरीही केवळ पोलिसांमुळे शहरात शांतता नांदतेय, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केले आहे. यावरून कर्नाटकातील विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून त्यांनी परमेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बंगळुरूतील रस्त्यावर एक व्यक्ती दोन मुलींजवळ जाऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून पळून जातानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. बंगळुरूच्या बीटीएम लेआउट परिसरात 3 एप्रिल रोजी ही घटना घडली. आज याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी गृहमंत्र्यांना याबाबत विचारले असता, बंगळुरूसारख्या मोठय़ा शहरात अशा घटना होतच असतात असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी याप्रकरणी आपले मौनव्रत तोडून परमेश्वर यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपाने केली आहे.