रिक्षा चालकाच्या मुलाची चित्रपट दिग्दर्शनात भरारी; कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडला

रिक्षा चालकाच्या मुलाने मराठी चित्रपट दिग्दर्शनात भरारी घेतली असून, त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कर्मवीरायण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिक्षणक्षेत्रात राज्यभरातील विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देऊन गावोगावी ज्ञानाची गंगा वाहून नेणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील कर्मवीरायण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कर्मवार भाऊराव पाटील यांचा आयुष्यरूपी जीवनसंघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील संघर्षगाथा कर्मवीरायण चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. सौमित्र किशोर कदम यांनी ज्येष्ठ वयातील भाऊरावांची भूमिका साकारली आहे, तर ऐन तारुण्यातील भाऊराव म्हणून सुहास शिरसाट यांनी भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भाऊरावांचा सुरू झालेला संघर्ष, कौटुंबिक अडचणी, सामाजिक संघर्ष कायमचा त्यांच्या वाट्याला आलेला असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्या काळातही नानाविध क्षेत्रात कार्यरत असणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागनाथ आण्णा नाईकवडी, गाडगेबाबा, आचार्य अत्रे यांच्यासह अनेकांनी मोठा पाठिंबा दिला होता. चित्रपटाची पटकथा अनिल सपकाळ, धनंजय भावलेकर, सावनी यांनी लिहिली आहे. चित्रीकरण योगेश कोळी यांनी केले आहे. किशोर कदम, देविका दफ्तरदार, सुहास शिरसाट, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, राहुल सोलापूरकर यांनी दमदार अभिनय केला आहे. गायक शंकर महादेवन, नंदेश उमप, धनश्री गणत्रा यांनी विविध गीते स्वरबद्ध केली आहेत.

झोपडपट्टीत वास्तव्य ते दिग्दर्शकाचा प्रवास

दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये राहून चित्रपट दिग्दर्शनाची यश प्राप्ती मिळविली आहे. त्यांचे वडील रिक्षाचालक आणि आई रुग्णसेविका असून, झोपडपट्टीतील अतिशय छोट्याशा खोलीत दिवसरात्र मेहनत करून त्यांनी चित्रपट, नाट्य, कला, दिग्दर्शन, शॉर्टफिल्मचे धडे गिरविले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातही बाजी मारून त्यांनी कलाक्षेत्रात आपले यश टिकविले आहे. लघुपट निर्मितीसह चित्रपट दिग्दर्शनात यशस्वी बाजी मारत आतापर्यंत भावलेकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार पटकाविले आहेत. आगामी काळात विविध महापुरुषांचे खडतर आयुष्य चित्रपटांद्वारे उलगडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे धनंजय भावलेकर यांनी सांगितले.