मिंधेंच्या आमदाराचा विकास ‘खड्ड्या’त गेला; नाले, ओढ्यात खड्डे खणून कर्जतकरांना भागवावी लागते तहान

कर्जत-खालापूर मतदारसंघातील मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला विकास खड्ड्यात गेला आहे. तालुक्यातील पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाळा संपल्यानंतर एका महिन्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. डवऱ्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नाले आणि ओढ्यांमध्ये खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत. त्यामुळे आमदारांनी विकासाच्या नावाखाली आणलेले कोटीच्या कोटी रुपये कुठे मुरले, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी हजार कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र निधीच्या तुलनेत मतदारसंघात अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे निधी कुठे खर्च झाला हे आता नागरिकांना दुर्बिण लावून शोधावे लागत आहे. थोरवे हे मतदारसंघाचा विकास करण्यात अपयशी ठरल्यामुळे ग्रामीण भागाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पावसाळा संपून एक महिना लोटलेला असताना गावंड वाडीतील भयानक वास्तव समोर आले आहे. या परिसरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे ग्रामस्थांना एक ते दोन किलोमीटरची पायपीट करून डोंगर कपारीतील डक्ऱ्याचे पाणी आणवे लागत आहे.

खडकाळ जागेत विहीर खोदली

गावंड वाडी परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एक योजना तयार करण्यात आली. या योजनेंतर्गत पाण्याची टाकी बांधून तयार करण्यात आली आहे. विहीरही खोदली गेली आहे. मात्र ही विहीर खडकाळ जागेत खोदल्याने तिला पाणी लागले नाही. पावसाचे पाणी विहिरीमध्ये जमा होत आहे. त्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थ या पाण्याचा वापर करीत नाहीत. आमदार महेंद्र थोरवे गेल्या पाच वर्षांत या भागात एकदाही फिरकले नसल्याने त्यांच्यावर ग्रामस्थ नाराज आहेत.