मिंधेंच्या बगलबच्चांचा कारनामा; बनावट कागदपत्रे बनवून 28 एकर जमीन ढापली

karjat-mindhes-worker-exploits-28-acres-of-land-was-acquired-by-making-fake-documents
प्रातिनिधिक फोटो

मिंर्धेच्या बगलबच्चांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने मालक असल्याचे भासवून 28 एकर जमिनीचा घोटाळा केल्याची घटना कर्जतमध्ये समोर आली आहे.

धक्कादायक म्हणजे या बगलबच्चांनी ही जमीन वेगवेगळ्या बिल्डरला रजिस्टर खरेदी खताद्वारे परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जमीनमालक महिलेने कर्जत उपविभागीय पोलीस कार्यालयात तक्रार दिली असून मिंधे गटाच्या लालचंद घरत यांच्यासह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कर्जतमधील शिंगढोल परिसरात ही 28 एकर जागा असून आस्पी बलसारा यांनी 1989 मध्ये ही जागा खरेदी केली होती. या जागेवर आस्पी त्यांची पत्नी हेमा, मुलगा झाल आणि मुलगी टिना यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आस्पी यांच्या मृत्यूनंतर जागेच्या देखभालीची जबाबदारी मुलगी टिना हिच्याकडे सोपवण्यात आली होती. टिना यांचे लग्न झाले असून त्या कॅनडा येथे स्थायिक झाल्या आहेत. मात्र तेथून कायदेशीर सल्लागार अॅड. सुशांत अरोरा यांच्या मदतीने जागेचे व्यवहार सांभाळतात.

दरम्यान, मूळ मालक परदेशात असल्याची संधी साधत लालचंद घरत याने भिवंडीतील चंद्रकांत पाटील आणि अन्य साथीदारांच्या मदतीने जमिनीचे खोटी कागदपत्रे तयार करून बोगस मालक असल्याचे भासवून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयातून ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.

बिल्डरांना विकून कोट्यवधींची माया जमवली

मिंधेंचा बंगलबच्चा लालचंद घरत हा आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्ती आहे. त्याने 19 डिसेंबर 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडप केल्यानंतर त्याचे रजिस्टेशन करून चंद्रकांत पाटील, विजय पाटील, अंबरनाथमधील रवींद्र देशपांडे व अन्य 16 जणांच्या मदतीने विविध बिल्डरांना विकली आहे. यातून या टोळीने कोट्यवधींची माया जमवली आहे.