
साळोख नारळाचीवाडी येथील जमिनीबरोबर दफनभूमी हडप करण्याचा डाव उघडकीस आला आहे. ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या दोघांनी जेसीबी लावून जागेची साफसफाई करतानाच या जागेच्या बाजूला असलेल्या दफनभूमीलाही जेसीबी लावून थडगे उकरल्याने मृतदेहांची विटंबना झाली आहे. हा भयंकर प्रकार निर्दशनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाचीवाडी येथील सर्व्हे नंबर 72/2 ही 8 एकर जागा बुधाजी थोराड आणि कमळी कांबडी यांची आहे. या जागेला लागून मृत तुलसीबाई पवार यांची सीलिंगची जागा आहे. शासनाने ही जागा आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती. त्यांच्या जागेत आदिवासी समाजाची दफनभूमी आहे. मात्र याच वाडीत राहणारे ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या दोघांनी गावातील काही नागरिकांना हाताशी धरून जेसीबीच्या सहाय्याने साफ केली. यात अनेक सागाची झाडे तोडण्यात आली. तसेच दफनभूमीतील मृतदेह उकरले. यातील काही जागा बेकायदेशीररित्या परस्पर विकल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जागा मालक थोराड आणि कांबडी यांनी जागेवर अतिक्रमण केल्याबाबत सालोख ग्रामपंचायत सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी आणि कर्जत तहसीलदार, नेरळ पोलीस यांना लेखी निवेदनदेखील दिले आहे.
दोषींवर कारवाई होणार
वन विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. जागेवरील सागाची झाडे तसेच अन्य झाडे विनापरवाना तोडल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तलाठी महिला अधिकारी ज्योती पाटील, सर्कल अधिकारी अरुण विशे हेदेखील गावात दाखल झाले आणि त्यांनी चर्चा केली. त्यानंतर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणार असल्याचे सांगितले.