कर्जत हत्याकांडाचे धागेदोरे सापडले; भाऊ, पुतण्या, गर्भवती वहिनीचा सख्ख्या भावानेच काढला काटा

नेरळ परिसरातील चिकणपाडा गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे धागेदोरे अखेर सापडले आहेत. घराच्या वादातून आरोपी हनुमंत पाटील यांनी आपला सख्खा भाऊ, पुतण्या आणि गभर्वती वहिनीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून आरोपीसह त्याची पत्नी आणि मित्राला ताब्यात घेतले आहे. सख्ख्या भावाने नात्याचीच हत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मदन पाटील, पत्नी अनिशा, मुलगा विवेक यांचे मृतदेह काल चिकणपाडा गावातील नाल्यामध्ये आढळून आले होते.

नेरळ शहरापासून जवळच असलेल्या चिकणपाडा गावात मदन पाटील आणि त्याचे कुटुंब गेल्या 15 वर्षांपासून राहत होते. रविवारी सकाळी या तिघांचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यात आढळून आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रवाना झाले. जवळच्या नातेवाईकांची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये मदन पाटील यांचा भाऊ हनुमंत पाटील यांनी दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना दिली. प्रत्येक वेळेस त्याचा जबाब वेगवेगळा आल्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह त्याची पत्नी आणि एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मदन आणि हनुमंतचे वडील जैतू पाटील यांनी चिकणपाडा गावात जागा घेऊन घर बांधले आहे. या घरात सध्या मदन आणि त्याचेच कुटुंब राहत होते. अर्धे घर नावावर कर असा तगादा हनुमंत यांनी लावला होता. मात्र मदन हे घर त्याच्या नावावर करण्यास तयार नव्हता. या वादातूनच हनुमंत याने मदन आणि त्याची पत्नी व मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून तो ‘दृश्यम’ बघत होता

हनुमंतला क्राइम डायरी आणि क्राइम चित्रपट बघण्याची आवड होती. गेल्या अनेक महिन्यांपासून तो अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहत होता. चित्रपट पाहूनच त्याने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा संशय आहे. आपला भाऊ, वहिनी आणि पुतण्याला मारण्यापूर्वी हनुमंत हा पत्नीसह नातेवाईकांकडे गणपतीसाठी गेला. त्यानंतर त्याने पत्नीला तेथेच ठेवून तो पुन्हा गावात आला आणि या तिघांची हत्या केली. हे सर्व कटकारस्थान त्याने दिशाभूल करण्यासाठी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.