नायलॉनच्या दोरीने महिलेचा गळा आवळला नंतर बॅगमध्ये कोंबले; कर्जतमधील ‘सुटकेस बॉडी’च्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चार पथके

कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या ‘सुटकेस बॉडी’ प्रकरणात अद्याप पोलिसांना आवश्यक धागेदोरे हाती लागले नसले तरी आरोपीने हत्या झालेल्या महिलेचा आधी नायलॉनच्या दोरीने गळा आवळला नंतर बांधून तिला बॅगमध्ये कोंबल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याचप्रमाणे तीन ठिकाणांहून कर्जत पोलिसांना बेपत्ता महिलेची तक्रार मिळाली असून त्यादृष्टीने तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत.

मुंबईहून पुणेकडे येणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील टीकेडब्ल्यू किमी क्रमांक 112/5 जवळ कर्जतच्या ठाकूरवाडी परिसरात सकाळी सवाअकरा वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकांना गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली होती. या सुटकेसमधून हात बाहेर लटकत असल्याचे दिसताच ही घटना रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलिसांना देण्यात आली होती. महिलेच्या अंगावर लाल टीशर्ट आणि सफेद लेगिन्स असून हात-पाय नायलॉन दोरीने बांधण्यात आले होते. महिलेचा चेहरा प्लास्टिक पिशवीने पूर्णतः झाकून ठेवला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह कर्जत प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून नंतर पनवेल येथे हलवण्यात आले आहे.

अंगावर मारहाणीच्या खुणा

महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असून ही महिला 28 वयोगटातील आहे. महिलेच्या हत्या प्रकरणात चार पथक तयार केले असून यामध्ये क्राईम ब्रँच पथकदेखील तपासासाठी तैनात असणार आहे. घडलेल्या घटनेच्या दिवशी पुणे दिशेने धावणाऱ्या एक्स्प्रेसची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान भायखळा आणि सिंहगड पोलीस ठाणे येथून बेपत्ता महिलेची तक्रार दाखल असून त्यादृष्टीनेदेखील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांनी सांगितले. घटनास्थळी आज रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी भेट दिली.