सावित्रीच्या लेकींच्या हस्ते शाळेचे भूमिपूजन, कराडमधील वहागाव ग्रामस्थांचा कौतुकास्पद उपक्रम

कराड तालुक्यातील वहागाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन कोणत्याही राजकीय नेत्याच्या हस्ते न करता, गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते करण्याचा कौतुकास्पद निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यानुसार गावातील तब्बल 150 ‘सावित्रीच्या लेकीं ‘च्या हस्ते नारळ वाढवून शाळा इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

वहागाव कायमच चांगल्या कामासाठी जिल्ह्यात चर्चेत असते. गावामध्ये शिक्षणाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजत असून, जिल्हा परिषदेची शाळा कराड तालुक्यात प्रथम क्रमांक व सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर आहे. शाळेचा पट गेली तीन वर्षे सातत्याने वाढत आहे. त्यासाठी गावातून शाळेसाठी योगदान देण्याची वृत्ती वाढत आहे. लोकसहभागातून शाळेचा कायापालट होत आहे.

महिलांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन घेऊन निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेण्याचे क्रांतिकारी पाऊल गावाने उचलले आहे. वहागावला गेल्या चार वर्षांत विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामागिरी केल्याबद्दल ‘स्व. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार’, ‘संत गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार’ मिळाले आहेत. आदर्श गाव घडविण्याच्या दृष्टीने शाळा, आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, स्वच्छता, रोजगार, महिला बचत गट अशा विविध क्षेत्रांत गावाची वाटचाल सुरू आहे.

सरपंच संग्राम पवार, उपसरपंच संतोष कोळी, धनंजय पवार, आनंदी पवार, तुषार पवार, रंजना पवार, शीला पवार, सुजाता पुजारी, विनोद पवार, साळुंखे, मुख्याध्यापक पवार, विद्याधर गायकवाड, अक्षय मोहिते, राहुल वायदंडे आदी उपस्थित होते.

मुलांना जि.प. शाळेत दाखल करा

■ शासकीय शाळांचा दर्जा सुधारून नवीन पिढीला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचा कायापालट होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी जिल्हा परिषद शाळेत मुलांना दाखल करावे, असे आवाहन महिलांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून सरपंच संग्राम पवार यांच्या प्रयत्नांतून ६० लाखांचा निधी मिळाला असून, यातून शाळेची इमारत उभी राहत आहे.